मराठवाडय़ातील अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. आर. पी. कुरुलकर यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात १९७२ पासून त्यांनी अध्यापनाचे काम केले. ते या विभागाचे काही काळ विभागप्रमुख होते. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था व मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते सक्रिय सभासद होते. तसेच मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी काही वर्ष भूषविले. मराठवाडय़ाच्या सिंचनाचा अनुशेष आर्थिक अंगाने आणि बौद्धिक स्वरूपातही तपासण्यात त्यांचा मोठा वाटा असे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विविध शासकीय समित्यांवरही काम केले आहे.