श्रीगोंदे शहरापासून अवघ्या ६ किमी अंतरावर घोडेगावजवळील दरेकर वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत बापूसाहेब बापूजी दरेकर (वय ५५) यांचा मृत्यू झाला. चोरटय़ांनी १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तालुक्यात दरोडय़ांची मालिका सुरूच असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. दरम्यान, १० दिवसांत गुन्हेगारांचा शोध न लागल्यास श्रीगोंदे पोलीस ठाण्यासमोरच दशक्रिया विधी करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मध्यरात्री दोनच्या सुमारास हा दरोडा पडला. बापूराव दरेकर नेहमीप्रमाणे घराच्या पडवीत झोपले होते. या वेळी अज्ञात तीन चोरटे घरात घुसले. त्यांनी दरेकर यांना उठवले. घराचा दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. दरेकर यांनी विरोध करताच त्यांच्या डोक्यामध्ये जोरदार वस्तूने प्रहार केला, त्यामुळे बापूराव यांनी घरात झोपलेल्या त्यांच्या सूनबाई सीमा हनुमंत दरेकर यांना हाक मारली. त्यांनी दरवाजा उघडताच त्यांनाही दम देत चोरटे घरात शिरले. घरात उचकापाचक करून सीमा यांच्या अंगावरील दागिने घेऊन ते पळून गेले.
दरेकर यांचा मुलगा सैन्यात असून सध्या नवी दिल्ली येथे आहे. घटनास्थळी सकाळी श्वानपथक आणण्यात आले होते. श्वानाने हिरडगाव कारखान्यापर्यंत माग काढला. ठसेतज्ज्ञांनाही येथे पाचारण करण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता ठाकरे, उपाधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक सुरेश गायधने व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

Story img Loader