मराठवाडय़ातील ध्येयवादी पत्रकारितेची ‘कावड’ प्रदीर्घ काळ आपल्या खांद्यावर पेलणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, तसेच विकास चळवळीतील कृतिशील सुधाकर विनायक डोईफोडे (वय ७७) यांचे बुधवारी हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी मालतीताई, दोन मुले, सुना, ५ भाऊ, बहीण, नाती, नातू असा मोठा परिवार आहे. डोईफोडे यांचे पार्थिव हैदराबादहून येथे आणण्यात आले. उद्या (गुरुवारी) सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार होतील. निधनाचे वृत्त येताच असंख्य चाहत्यांनी भाग्यनगरातील डोईफोडे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सुधाकरराव गेले काही आठवडे यकृताच्या विकाराने त्रस्त होते. स्थानिक डॉक्टरांनी उपचार केल्यावर त्यांना मागील आठवडय़ात हैदराबादला तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार घेण्यासाठी नेण्यात आले. बुधवारी त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास थांबला.
पत्रकारिता, समाजकारण व राजकारणातून डोईफोडे यांचा मराठवाडय़ात सर्वदूर दबदबा होता. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली पेशाकडे पाठ फिरवून डोईफोडे निश्चयपूर्वक पत्रकारितेत आले. ‘प्रजावाणी’ साप्ताहिक १९६२ मध्ये सुरू करताना डोईफोडे त्याचे संपादक झाले. वयाच्या अकराव्या वर्षी ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजामविरोधी मोर्चात सहभागी झाले. स्वातंत्र्योत्तर काळात आणीबाणीला त्यांनी विरोध केला. १९६७ मध्ये व्यंकटराव तरोडेकर यांचा पराभव केला. समाजवादी विचारांनी त्यांनी राजकारण केले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या स्थापनेनंतर रेल्वेविषयक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून मराठवाडय़ाचे रेल्वेचे प्रश्न वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडून जनजागृती केली.
नांदेडच्या समाजजीवनावर दीर्घकाळ ठसा उमटविणाऱ्या सुधाकाररावांना स्थानिक, विभागीय तसेच राज्य पातळीवरील अनेक मान-सन्मान मिळाले. पहिला नांदेड भूषण पुरस्कार त्यांना मिळाला. ‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठाने अलीकडेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, मंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव खतगावकर, प्रा. दत्ता भगत, प्रा. तु. शं. कुळकर्णी, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी डोईफोडे यांना श्रद्धांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा