सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या सिद्धिविनायक गणपती कॅन्सर इस्पितळासमोर रस्ता ओलांडणाऱ्या रुग्णाला भरधाव मालट्रकने ठोकरल्याने शुक्रवारी मृत्यू झाला.  या अपघातात त्याच्या सोबत असलेला त्याचा सहायक जखमी झाला असून चालत्या ट्रकमधून उडी टाकून चालकाने पलायन केले.
शुक्रवारी दुपारी मालट्रक (के.ए. २२ ए.ए. ५९६४) हा औद्योगिक वसाहतीतून सांगलीकडे जाण्यासाठी वळत होता.  त्याचवेळी निजामुद्दीन अहमत मुकादम (वय ६५, रा. महाड) हा रुग्ण इस्पितळात औषधाबाबत विचारणा करण्यासाठी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या सोबत अशरफ अब्दुल्ला पास्कर (वय ४८, रा. महाड) हा होता. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ट्रकने एकदम वेग घेतल्याने रुग्ण निजामुद्दीन मुकादम याला जोरदार धडक दिली. या धडकीत दोघेही जखमी झाले.  दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेत असताना मुकादम यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर पास्कर याला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर चालता ट्रक सोडून चालकाने पलायन केले.  त्यामुळे हा ट्रक समोरील असणाऱ्या चहाच्या टपरीमध्ये घुसला. या टपरीचे नुकसान झाले असलेतरी टपरीचालक मात्र प्रसंगावधनाने बचावला. ट्रकमधून उडी मारून पळणारा इराप्पा मलशेट्टी (वय ३०, रा. मुनोळी, ता. सौंदत्ती) याला जमावाने पकडले.  मात्र त्याने आपण ट्रकचा क्लीनर असून ट्रकचालक पळून गेल्याचे सांगितले.  याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.