संक्रांतीच्या पतंगबाजीला नगर शहरात तरुणाच्या मृत्यूचे गालबोट लागले. पतंग उडवताना चौथ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून हा तरुण मरण पावला. कोपरगाव येथे पतंगाच्या मांज्याने एका छोटय़ा मुलीचा गळा कापल्याने ती गंभीर जखमी आहे.
नगर शहरातील सावेडी भागात झालेल्या अपघातात रोहित राजन निकुंभ (वय २४, राहणार ल्क्ष्मी उद्यान, भूतकरवाडी) हा तरुण मरण पावला. सावेडी रस्त्यावरील सिव्हिल हडको भागातील एका चारमजली इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना ही घटना घडली. गच्चीवरून पडल्यानंतर रोहितला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यात पतंग उडवण्याबाबतचा उल्लेख नाही.
मांज्याने मुलीचा गळा कापला
कोपरगाव येथे सपना शिवाजी शिंदे (वय ९) ही मुलगी पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झाली. मोहनीराजनगर, कोपरगावपेठ भागात ही घटना घडली. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिला टाके पडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संक्रांत असल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात पतंग उडवले जात असताना ही घटना घडली.

Story img Loader