सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ३ नीलगायींचा पाच दिवसांत गूढ आजाराने मृत्यू झाला. हा मृत्यू न्यूमोनिया की तोंड येणे किंवा अन्य काही कारणांनी झाला, याचे निदान होऊ शकले नाही. आणखी दोन नीलगायींवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकारानंतर उर्वरित सर्व नीलगायींना वेगळे ठेवण्यात आले असून पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याने मुंबईहून ती मागविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.
दगावलेली जनावरे एक ते दोन वर्षे वयाची वासरे आहेत. या शिवाय तीन ते चार वर्षांच्या दोन नीलगायी आजाराने त्रस्त आहेत. मात्र, हा आजार कोणता, हे अजून निश्चित होऊ शकले नाही. तोंडामध्ये चट्टे दिसणे व फुफ्फुस खराब होणे अशा प्रकारचा हा आजार असल्याचे सांगितले जाते. तोंड येणे (व्हॅसिक्युलर स्टोमॅटायटिस) किंवा न्यूमोनिया यापैकी हा आजार असू शकतो. लाळ्या खुरकतासारख्या तोंड येण्याच्या आजाराची जनावरांना बाधा होण्याचा प्रकार बळावू शकतो, असे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. दगावलेल्या वासरांचा शवविच्छेदन अहवाल मुंबईला पाठविण्यात आला. तसेच पुणे व उदगीर येथेही लाळेचे नमुने तपासणीस पाठविले आहेत.
सुमारे ८-९ वर्षांपूर्वीही याच उद्यानात असा प्रकार घडला होता. त्यावेळी १३-१४ नीलगायींचा मृत्यू झाला होता. मात्र, आता घडलेल्या नीलगायींच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे समजल्यानंतरच उपायांची दिशा निश्चित होऊ शकणार आहे. नीलगायींचा मृत्यू होण्याच्या प्रकारानंतर उद्यानात प्राण्यांसाठी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एस. व्ही. भालेराव, पशुधन विकास अधिकारी डॉ. काळे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे आदींचे पथक स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Story img Loader