शहरातील हैदराबाद रस्त्यावर एका भरधाव आयशर टेम्पोने पाठीमागून मोटारसायकलीस ठोकरल्याने घडलेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
कृष्णमूर्ती विठ्ठल गेंटय़ाल (वय २६, रा. जुने विडी घरकुल, हैदराबाद रोड) व रामकृष्ण नागनाथ विडप (वय २५, रा. साईबाबा चौक, पूर्व भाग) अशी या अपघातातील दोघा मृतांची नावे आहेत. त्यांच्या सोबतचा गणेश एक्कानारायण तलकोकुल (वय २८, रा. गवई पेठ, कवितानगर पोलीस वसाहतीजवळ) हा गंभीर जखमी झाला. हे तिघेजण हैदराबाद रस्त्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करून रात्री उशिरा मोटारसायकलवरून घराकडे परत येत होते. परंतु वाटेत चंदनकाटा-ताज हॉटेलजवळ पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच १३ एएक्स-३७८७ या आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आयशरचालकाने अपघातानंतर पलायन केले असून, त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader