भरधाव बसची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त जमावाने बसवर जोरदार दगडफेक केली. यात बसचे मोठे नुकसान झाले. गजानन महाराज मंदिराजवळील कडा कार्यालयासमोर सकाळी साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला.
शकील हैदर पटेल (वय ३२, देवळाई, सातारा परिसर) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. आरती ट्रॅव्हल्सची बस (एमएच २० बीटी ४७३१) व्हेरॉक कंपनीच्या कामगारांना घेऊन सेव्हन हिलकडून गजानन महाराज मंदिराच्या दिशेने जात होती. कडा कार्यालयासमोर बसने समोरून जाणाऱ्या शकील पटेलच्या मोटरसायकलला धडक दिली. यात शकील गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. संतप्त जमावाने बसवर मोठय़ा प्रमाणात दगडफेक करून तोडफोड केली. त्यामुळे बसमधील कामगारही घाबरले.
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक संगीता राऊत, राजपूत, उपनिरीक्षक गोरख चव्हाण, जमादार सोनार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शकील यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader