विधानसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी बडनेरा मतदार संघात मात्र राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान यांच्यातील शिमग्याने राजकीय वातावरण पेटवून दिले आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान ही संघटना आणि राष्ट्रवादी यापूर्वीही अनेकवेळा आमने-सामने आले आहेत, पण दोन कामांच्या भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांना काळे झेंडे दाखवल्याने हे मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत.
बुधवारी यशोदानगर ते दस्तूरनगर मार्गाची सुधारणा आणि पुलाच्या कामाच्या लोकार्पण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने करून रवी राणा यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेतर्फे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे नमूद करण्यात आल्याने हे कार्यकर्ते संतापले होते. रवी राणा यांनी सरकारी कामांचेही श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू केला असून लोकांची दिशाभूल चालवली आहे, असा या कार्यकर्त्यांचा आरोप होता. या भागातील विकास कामांसाठी राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश मार्डीकर, नगरसेविका ममता आवारे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काम पूर्ण केले. त्याचे श्रेय आमदार राणा घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
विनासंमती पत्रिकांवर नावे प्रसिद्ध केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रवी राणा यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. बुधवारच्या प्रकरणानंतर गुरुवारी बडनेरा-अंजनगाव बारी-मालखेड या राज्य मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन रवी राणा यांच्या हस्ते होत असताना अंजनगाव बारी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात नारेबाजी केली. सरकारने मंजूर केलेल्या प्रत्येक कामाचे श्रेय घेण्याची रवी राणा यांची धडपड सुरू आहे. अशा कामांमध्ये लुडबूड करण्याचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नावांचा युवा स्वाभिमानच्या पत्रिकेत उल्लेख करण्याचा प्रकार अत्यंत खेदजनक असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रवी राणा यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांना पराभूत केले होते. हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे अलीकडच्या काळातील अनेक घटनांमधून दिसून आले होते. मध्यंतरी दोन्ही आघाडय़ांमध्ये शांतता होती, पण निवडणुकीची चाहूल लागताच रवी राणा यांनी भूमिपूजन, लोकार्पण अशा कार्यक्रमांच्या आयोजनांमधून जनसंपर्काची मोहीम सुरू केली. त्याला उत्तर देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार शक्तीप्रदर्शन चालवले आहे.
निवडणुकीपर्यंत ही चढाओढ चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विकास विरोधी असल्याचा आरोप केला आहे. यशोदानगरजवळील लोकार्पण कार्यक्रमात परिसरातील नगरसेवकांना आदराने निमंत्रित करण्यात आले होते. तरीही त्यांनी काळे झेंडे दाखवले. अंजनगाव बारीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास कामाच्या शुभारंभाच्या वेळी निदर्शने केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हे कार्यकर्ते असा प्रकार करीत आहेत, पण हे लोक विकास विरोधी आहेत, हे जनतेला समजले आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे रवी राणा यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा