मागील सहा वर्षांपासून रेंगाळलेल्या उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी ५१ कोटींचा निधी पालकमंत्री मधुकर चव्हाण की खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खेचून आणला, या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कलगीतुरा रंगला. उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनी पालकमंत्र्यांमुळेच पैसे मिळाल्याचे म्हटले, तर राष्ट्रवादीच्या सदस्य अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्यामुळेच पैसे मिळाल्याचा दावा केला.
जिल्हय़ात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या पिकाचे पाणी तोडून इतरांची तहान भागविली, अशा अनेकांचे पैसे थकले आहेत. ते केव्हा देणार, असा प्रश्न अर्चना पाटील यांनी उपस्थित केला. टँकर, तसेच शेतकऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या विंधन विहिरीसाठी ५ कोटी सध्या थकीत आहेत. ही रक्कम वेळेत उपलब्ध करून न दिल्यास पुढील काळात वाद निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ कोटी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे मिळाले आहेत. हे पैसे मिळविण्यासाठीही त्यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू असल्याचे उपाध्यक्ष दुधगावकर यांनी सांगताच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ५१ कोटी कोणामुळे मिळाले, असा सवाल विचारत खासदार डॉ. पाटील व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच ही रक्कम उपलब्ध झाली. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा केला. अर्चना पाटील यांनी ५१ कोटी तुम्ही आणलेत, तर आता ५ कोटीही १५ दिवसांत उपलब्ध करून दाखवा, असे आव्हान दिले. त्यावर दुधगावकर यांनी, शेतकऱ्यांचे पैसे देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत लवकरात लवकर रक्कम उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
लोहारा तालुक्याचे पाणी पळविले
निम्न तेरणा प्रकल्पातून लोहारा तालुक्यासाठी दोन टीएमसी पाणी आरक्षित करावे, अशी मागणी लोहारा पंचायत समितीचे सभापती असिफ मुल्ला यांनी केली. निम्न तेरणा प्रकल्प लोहारा तालुक्यात आहे. त्याचा लाभ मात्र लातूर जिल्हय़ास होत आहे. तालुक्याचा पाणीप्रश्न दूर करण्यासाठी ५० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने त्याला मंजुरी द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाचा ठराव
आगामी रेल्वे अर्थसंकल्पात उस्मानाबादकरांच्या जिव्हाळय़ाचा असलेला सोलापूर-तुळजापूर-जळगाव हा रेल्वेमार्ग जाहीर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच कलमरस्ता रेल्वेस्थानकात अतिजलद गाडय़ांना थांबा द्यावा, असा ठराव उपाध्यक्ष दुधगावकर यांनी मांडला. सभागृहाने एकमताने ठरावास मंजुरी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा ‘वर्ग’
जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या विशेष सभेत जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी राज्य, देश व जिल्हा यामध्ये असलेली विकासाची तफावत मांडली. पदाधिकाऱ्यांनी नेमके काय काम करायला हवे, याचा वर्ग घेतला. रस्ते, सभागृह, वेगवेगळय़ा योजनांसाठी आपण नेहमीच आग्रह धरतो. परंतु शिक्षण व मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीत नाही. त्यामुळे जिल्हय़ाचे दरडोई उत्पन्न, राज्याच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण, माता-बालमृत्यूचा दर आणि केवळ आर्थिक संपन्नता नसल्यामुळे शिक्षणापासून दुरावलेल्या मुला-मुलींची संख्या त्यांनी सभागृहासमोर मांडली. पाच वर्षांच्या काळात आपण काय काम केले, याचेही मूल्यांकन पुढील काळात नक्कीच होईल, असेही त्यांनी नमूद केले.