मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराच्या सोहळय़ात सरकारच्या गतिमानतेची चर्चा चांगलीच रंगली. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या चर्चेला तोंड फोडले. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने गेल्या महिनाभरापासून सरकार अधिक गतिमान झाले आहे, असे वक्तव्य केले. त्यात दुसऱ्या आमदाराने दुरुस्ती केली. सरकार गतिमान होऊन पंधराच दिवस झाले आहेत, अशी ती दुरुस्ती होती. या सगळय़ा गतिमानतेला उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर आली. ते म्हणाले, हे सरकार आघाडीचे आहे आणि पूर्वीपासूनच त्यात गतिमानता होती.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने आमदार विक्रम काळे यांनी भाषणात चांगलाच रंग भरला. तसे चांगले निर्णय घेतले आहेत. पण त्याची गती वाढवायला हवी. तिजोरी किती खाली होते आहे, हे पाहू नका. शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या तर बरेच काही होईल. ‘आज आपल्या हातात आहे, उद्याचे काय माहीत? आता दिले तर गुरुजी निश्चित मतदानाच्या वेळी ते परत करतील. कारण गावागावांत मतदानापूर्वी लोकच त्यांना विचारतात, मतदान कोणाला करू?’ असे ते म्हणाले.
काळे यांनी हे वाक्य उच्चारताना महिनाभरात शासन गतिमान झाले आहे, असे मत व्यक्त केले. मात्र, आमदार सतीश चव्हाण यांनी व्यासपीठावरूनच, ‘महिनाभर नाही, १५ दिवसांपासूनच सरकारची गतिमानता वाढली आहे’ असे म्हटले. पूर्वी शिक्षकांना वैद्यकीय देयके मंजूर करून घेण्यास बरेच दिवस लागत. आता एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय देयक मंजूर करण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आदर्श शिक्षकांना दोन वेतनवाढी द्या, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजुरीदरम्यान वापरला जाणारा कायम विनाअनुदानित हा शब्दही कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांनी शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्याचे सांगत कनिष्ठ महाविद्यालयांच्या ‘कायम’ या शब्दाभोवतीची समस्या सोडविण्याची संचिका ‘योग्य’ व्यक्तीच्या हातात दिल्याचे सांगितले.
‘फ. मुं.ना आमदारकी द्या’
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील उत्कृष्ट शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करतानाच अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्कारानिमित्त आमदार विक्रम काळे यांनी फ.मुं.च्या मागे आता ‘आमदार’ ही पदवी लागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीच न्याय देते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. हा धागा पकडून मंत्री दर्डा यांनीही राजकीय टोलेबाजी केली. शिक्षक आमदार काळे यांनी केलेली मागणी पवारसाहेबांना सांगूनच केली असेल. त्यांचे व ‘साहेबां’चे संबंधही तेवढेच चांगले आहेत. त्यामुळे आता फ.मुं. विधान परिषदेत येतील. पण त्यांच्या ‘येण्याने’ कोणाचे तिकीट कापले जाईल, यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल, असे ते म्हणाले.
सोळंके यांची टीका
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पूर्वीच्या विश्वस्त मंडळाच्या कारभारावर अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जोरदार टीका केली. गेली २० वर्षे देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षणाचा अक्षरश: बाजार मांडला गेला होता. स्वत:च्या स्वार्थासाठी ही संस्था वापरली गेली. आता सत्तांतर झाले आहे. त्यामुळे आपली कोठे तरी बदली होईल, अशी भीती पूर्वी प्रत्येकाच्या मनात असायची. ती काढून टाका. कोणताही दबाव न घेता काम करा, असेही ते म्हणाले. या व्यासपीठावरून शिक्षक आमदार काळे यांनी सरकार दरबारी मागण्या मांडल्या. त्यांनाही सोळंके यांनी फटकारले. हे व्यासपीठ मागण्या मांडण्याचे नाही, असे त्यांनी सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा