लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना विविध वाहिन्यांनी घेतलेले मतदानोत्तर अंदाज जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात शांत झालेले निवडणूक चर्चेचे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. मतदानोत्तर अंदाजांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला चांगले यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून आपआपल्या मतदारसंघातील संभाव्य विजेते कोण राहतील, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
२४ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. मतदानानंतर कुठे किती मतदान झाले..वाढीव मतदान कोणासाठी फायदेशीर ठरेल..कोणत्या विधानसभा मतदारसंघात मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही..अशी चर्चा चार-पाच दिवस कार्यकर्त्यांमध्ये रंगली. कागदोपत्री केलेल्या आकडेवारीतून कार्यकर्ते आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपणच कशी बाजी मारणार हे उमेदवारांना पटवून दिले. त्यानंतर निवडणूकविषयक चर्चा मात्र पार थंडावली. संपूर्ण देशातील मतदानाचे टप्पे संपेपर्यंत राजकीय पातळीवरही विशेष घडामोडी थांबल्या. त्यामुळे काही दिवसांपासून एकूणच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी आलेली मरगळ मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर दूर पळाली असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये राजकीय गप्पांना जोर आला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांना महायुतीचे हेमंत गोडसे यांनी चांगलीच लढत दिल्याची चर्चा असल्याने या निकालाविषयी सर्वानाच कमालीची उत्सुकता आहे. मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार हे विजयाच्या स्पर्धेत कुठेही नसल्याचे त्यांचेच कार्यकर्ते मान्य करू लागले आहेत. मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले सुमारे १५ टक्के मतदान कोणासाठी फायदेशीर ठरू शकेल, याविषयी आघाडी आणि महायुती दोन्हीकडून दावे करण्यात येत आहेत.
दिंडोरी मतदारसंघात आघाडीच्या डॉ. भारती पवार आणि महायुतीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात चुरस आहे. काही तालुक्यांमध्ये डॉ. पवार तर, काही तालुक्यांमध्ये चव्हाण यांना अनुकूल परिस्थिती होती. त्यामुळे निकालाविषयी निश्चित असे मत व्यक्त करणे कार्यकर्त्यांसाठीही अवघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीची स्थिती उत्तम असल्याची चर्चा आहे. नंदुरबार आणि धुळे या दोन्ही मतदारसंघात चुरस आहे.
मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे असताना आघाडीचे कार्यकर्ते मात्र असे निष्कर्ष अनेकवेळा पूर्णपणे चुकले असल्याचा दाखला देत आहेत. परंतु या अंदाजाप्रमाणे निवणुकीचे निकाल लागल्यास विधानसभा निवडणुकीतही त्याचे प्रतिबिंब उमटू शकेल. या शक्यतेने काही राजकारणी मंडळींनी आतापासूनच धूर्तपणे भविष्यातील राजकीय डावपेच आखणे सुरू केले आहे. प्रतिस्पर्धी पदाधिकाऱ्यांशी संधान साधणे काही जणांनी सुरू केले असून युपीए असो किंवा एनडीए भविष्यातील सरकार कोणाचेही असले तरी या सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्राला कितपत स्थान मिळू शकेल याविषयीही चर्चा रंगू लागली आहे.
सध्या युपीए सरकारमध्ये नंदुरबारचे माणिकराव गावित हे उत्तर महाराष्ट्रातेच एकमेव मंत्री असून त्यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज अचूक ठरल्यास एनडीए सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता कोणाला अधिक आहे. याविषयी प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते आपली बाजू त्यासाठी कशी वरचढ ठरू शकते हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या चाचण्यांच्या अंदाजावर उत्तर महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराने प्रतिक्रिया व्यक्त न करता सावधगिरी बाळगली आहे.