कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अंतिम दरासाठी २५० रुपये द्यावेत व इतिवृत्तातील गटवार पद्धत यावरून वादंग माजले. ऊस दर विषयावरील वादळी चर्चेमुळे सभेत तणाव निर्माण झाला होता. परस्परांची उणीदुणी काढण्याच्या प्रयत्नात सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आव्हान दिले गेले. सभाध्यक्षांकडून समर्पक उत्तरे मिळत नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला.     
इतिवृत्त चुकीचे लिहिले आहे, असा आक्षेप घेत बाळासाहेब खाडे यांनी गेली सभा ७ मिनिटांत संपली असताना २० मिनिटांचा इतिवृत्तात उल्लेख कसा केला, अशी तक्रार केली. यावर नरके म्हणाले, की इतिवृत्तातील विषयांमध्ये सर्व गोष्टींची सागोपांग चर्चा झाली होती. त्यामुळे इतिवृत्ताला गटवार निवड पद्धतीतील पूर्वीपासून भौगोलिक रचनेचा विचार करून ठरवली आहे. त्यामुळे सर्वाचा मतदान अधिकार अबाधित ठेवून बहुमताने हा विषय मंजुरीस घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.    
ऊसदराच्या कळीच्या मुद्याला बाळासाहेब खाडे, पुंडलिक पाटील यांनी सुरुवात केली. २५० रुपये कसे देता येतील, याबाबत त्यांनी सहवीज प्रकल्प कर्जावरील व्याज, डिस्टिलरी पूर्ण क्षमतेने न चालल्यामुळे झालेले ३ ते ५ कोटी रुपयांचा तोटा, याच बरोबर कुंभीला मिळणारा ऊस हा दर्जेदार असून तो केवळ १० किमी अंतरातून येतो. तरीही जिल्ह्य़ातील इतर कारखान्यांच्या मानाने हा दर २५० रुपये प्रतिटन कमी आहे. त्यामुळे कुंभी पिछाडीवर पडला आहे. अध्यक्षांनी याचा खुलासा करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.    
आमदार नरके म्हणाले, सभासदांना सवलतीची साखर देतो, तसेच सहवीज प्रकल्पामुळे व सह उत्पादनांमुळे त्यांना आर्थिक फायदा होत आहे. आपले आधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर आपणही आर्थिक अधिक दर देऊ शकतो, असे सांगितले.     
या वेळी शंकर पाटील यांनी सत्तारूढ संचालकांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. आमदार नरके यांनी आपली याला तयारी असल्याचे सांगितले. मात्र तोटा होऊनही आणखी २०० रुपये तरी द्या, अशी मागणी टी.एल.पाटील, कुंडलिक पाटील यांनी केली. पण नरके यांनी २६१० रुपये दर देऊन संस्था वाचविण्याचे व सभासदांना समाधानकारक दर दिल्याचे सांगितले. या वेळी आमदार सभेमध्ये समाधानकारक उत्तर देत नाहीत, तसेच सभा रेटून घेऊन जात आहेत असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. एक तासात सभेपुढील सर्व विषय मंजूर झाले. स्वागत एम.ए.पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष शामराव गोधडे यांनी मानले.