नगर तालुक्यातील विकास कामांच्या राजकीय श्रेयावरुन राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला आहे. वाळकी गटातील काही विकास कामांचे भुमिपुजन कार्यक्रम उद्या (शुक्रवारी) पालकमंत्री पाचपुते यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहेत, या कामांच्या मंजुरीसाठी आपणच प्रयत्न केले असा दावा करत हराळ यांनी त्याचा शुभारंभ आज घाईगडबडीत उरकुन टाकला. यावेळी बोलताना हराळ यांनी पाचपुते ‘ढोंगंीमहाराज’ असल्याचा आरोप केला. काही महिन्यांपुर्वी या दोघांत असाच वाद रंगला होता.
नगर तालुक्यातील वाळकी व चिचोंडी पाटील हे दोन गट श्रीगोंदे मतदारसंघास जोडले गेल्यानंतर तर दोघांतील हा राजकीय श्रेयाचा वाद वारंवार उफाळून येऊ लागला आहे. त्यातुन नागरीकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. हराळ यांनी आज केलेल्या आरोपांना पाचपुते उद्या काय उत्तर देणार, याकडे लोकांचे लक्ष राहील. वाळकी गटातील गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, हातवळण, रुईच्छतीशी, वाटेफळ आदी गावातील विविध कामांचा शुभारंभ राष्ट्रवादीच्या नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उद्या दिवसभरात पाचपुते यांच्या हस्ते आयोजित केला आहे. त्यामध्ये नाशिक पॅकेज, १३ वा वित्त आयोग, जनसुविधा योजनांतील कामांचा समावेश आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने वृत्तपत्रात जाहीरात प्रसिद्ध केली आहे.
ते पाहताच हराळ यांनी आज काँग्रेस कार्यकर्त्यांना समवेत घेत नाशिक पॅकेजमधुन होत असलेल्या वाळकी ते वडगाव तांदळी, गुंडेगाव ते कोरेगाव, साकत ते कार्लेवस्ती, वाटेफळ ते अमृतेमळा, मठपिंप्री ते कळमकर वस्ती या कामांचे नारळ फोडुन शुभारंभ केले. आपण जि.प. सभापती असताना वाळकी गटासाठी कामे मंजुर करुन स्वतंत्र निधी उपलब्ध केला, पालकमंत्री त्याचे श्रेय लाटायला निघाले आहेत, दुसऱ्यांच्या प्रयत्ननातुन होणाऱ्या कामांची उद्घाटने ते करत आहेत, श्रीगोंद्यातील जनतेला झुलवणारे ढोंगी महाराज आता नगर तालुक्यातील जनतेला नादी लावत आहेत, राळेगण ते गुंडेगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपुर्वी झाले, त्याचेही उद्घाटन करायला पालकमंत्री निघाले आहेत, असा आरोप हराळ यांनी केला. जि. प.चे माजी सदस्य गुलाबराव कासार यांच्या हस्ते वाळकी गटात, साकतमध्ये निवृत्ती पवार, गुडंगावमध्ये वामन जाधव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Story img Loader