वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, पुरेशा नियोजनाचा आभाव यामुळे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची कामे रडतखडत सुरू असली तरी नवी मुंबईत मात्र येत्या दोन वर्षांत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होईल, असा आशावाद सिडको वर्तुळात व्यक्त होऊ लागला आहे. डिसेंबर २०१५ पर्यंत सीबीडी-बेलापूर-पेंढार हा सुमारे ११ किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होईल, असा दावा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. आंतरराष्ट्रीय विमानतळास अत्यंत पूरक ठरू शकेल अशा पद्धतीने बेलापूर-खारघर-तळोजा आणि पुढे खांदेश्वर-तळोजा या १९ किलोमीटर अंतराच्या पट्टय़ात दिल्लीच्या धर्तीवर मेट्रो रेल्वेची योजना आखणाऱ्या सिडकोने या भागात तब्बल १८ मेट्रो स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईकरांसाठी नावीन्याची ठरणारी ही मेट्रो रेल प्रामुख्याने खारघर, कामोठे-कळंबोलीकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय घेऊन येणार असून या उपनगरांमध्ये या मेट्रोची सर्वाधिक स्थानके देण्यात आली आहेत.
सीबीडी सेक्टर सात येथील नागरी वस्तीमधून सुटणारी ही मेट्रो रेल खारघर, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली अशा त्रिकोणातून प्रवास करणार आहे. यामुळे या सर्व नागरी वसाहतींना भविष्यात मोठी मागणी निर्माण होणार आहे. नवी मुंबई पट्टय़ात होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पाविषयी येथील रहिवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असून या नव्या प्रकल्पाचा मार्ग नेमका कसा असेल, याविषयी उत्सुकता आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि लुईल अ‍ॅण्ड बर्जर कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर सिडकोने नवी मुंबई पट्टय़ात तब्बल सहा मेट्रो मार्ग आखले आहेत. यापैकी बेलापूर-खारघर-तळोजे-कळंबोली-खांदेश्वर आणि नियोजित विमानतळ या २१ किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग हे सिडकोचे पहिले लक्ष्य आहे. यापैकी सीबीडी-बेलापूर-पेंढार हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होऊ शकेल, असा दावा संजय भाटिया यांनी केला.
 बेलापूर ते पेंढार (तळोजे) या ११.१० किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. या कामाचा वेग समाधानकारक असून त्यामुळे हा मार्ग वेळेत पूर्ण होऊ शकेल, असा दावाही भाटिया यांनी केला. या पहिल्या टप्प्यात बेलापूर येथे मेट्रोचे मुख्य टर्मिनल असणार आहे. यानंतर सीबीडी सेक्टर सात येथे या मेट्रो मार्गाला पहिला थांबा देण्यात आला आहे. यानंतर खारघर येथील सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर- ११, खारघर सेक्टर- १४, सेंट्रल पार्क-खारघर, पेठापाडा-खारघर, सेक्टर ३४-खारघर, पंचानंद आणि पेंढार टर्मिनल अशी ११ मेट्रो स्थानके या पहिल्या टप्प्यात उभारली जाणार आहेत.  

विमानतळ प्रकल्पाला प्राधान्य
नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रासाठी (नैना) सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी पुनर्वसनाचे वेगवेगळे मॉडेल तयार करण्यावर आपला भर राहील, असेही भाटिया यांनी स्पष्ट केले. वाशी येथे सिडको उभारत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन संकुलाचे कामही येत्या जुलै महिन्यात पूर्ण होईल, असा दावा भाटिया यांनी केला.
नेरुळ-उरण रेल्वे
पर्यावरणाचा अडथळा तसेच आर्थिक कारणांमुळे वर्षांनुवर्षे रखडलेला उरण-नेरुळ-सीवूड उपनगरीय रेल्वे प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय सिडकोने आखले आहे, असा दावाही संजय भाटिया यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाच्या मुद्दय़ावरून सिडको आणि रेल्वे प्रशासनात मतभेत आहेत. या पाश्र्वभूमीवर भाटिया यांचा दावा कितपत खरा ठरतो, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader