महापालिकेतंर्गत येणाऱ्या शहरातील विविध झोनचे विकेंद्रीकरण झाल्याने झोनतंर्गत जनतेच्या गरजा त्वरित पूर्ण होण्यास मदत झाली आहे. झोनमध्ये सक्षमपणे काम सुरू असल्याने कामाचे मूल्यमापन करता येते. जनतेच्या समस्या सुटू लागल्याने   लोकाभिमूख प्रशासन जनतेला मिळत असल्याचा आनंद असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
झोन क्रमांक एक लक्ष्मीनगर मधील नागरी सुविधा केंद्र आणि विभागीय कार्यालयाच्या ईमारतीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, आयुक्त श्याम वर्धने, अपर आयुक्त हेमंत पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. झोनतंर्गत येणाऱ्या लोकांच्या समस्यांची जाण ठेवत प्रशासनाने तत्परता दाखवत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन चांगले प्रशासन द्यावे असेही फडणवीस म्हणाले.
महापौर सोले म्हणाले, अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर या जागेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सध्या ज्या ठिकाणी झोनचे कार्यालय आहे त्या ठिकाणी दिव. गंगाधर फडणवीस व्यायाम शाळा होती. झोनची निर्मिती करण्यात आल्यानतर देवेंद्र फडणवीस यांनी ती जागा महापालिकेला उपलब्ध करून दिली होती. जुन्या इमारतीमध्ये जागा कमी पडत असल्याने झोनचा प्रस्ताव ठेवण्यात आला. नव्याने बांधण्यात येत असलेल्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये विद्युत बांधकाम, पाणी , कर भरणा जन्म मृत्यू प्रमाणपत्र व इतर सर्व विभागाची कामे व जनतेला सुख सुविधा निर्माण करून देणार आहे. या इमारतीच्या प्रस्ताव मंजुरी देण्यास सतत पाठपुरावा करणारे झोनचे सभापती गोपाल बोहरे यांचे अभिनंदन करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामावर ६ कोटी २५ लाख रुपये खर्च होणार आहे. कामाच कंत्राट सुविचार कंस्ट्रक्शन यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र लोखंडे, सुभाष अपराजित, उषा बोहरे, सुमित्रा लुले आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.  

Story img Loader