नवी मुंबईचे तरुण महापौर सागर नाईक यांना शुक्रवारी सभागृहाला शिस्त लावण्याची लहर आली. त्यामुळे त्यांनी सभागृहात मनाप्रमाणे बसणाऱ्या नगरसेवकांना चक्क बाकावर नाव टाकून त्याच ठिकाणी बसण्याचे फर्मान सोडले. महापौरांच्या या निर्णयामुळे सभागृहात काही काळ गोंधळ झाला पण महापौरांनी मुंबई प्रांतिक धिनियमाचे पुस्तक नगरसेवकांना वाचून दाखविल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. त्यामुळे महापौरांच्या पाठशाळेची पालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.
नवी मुंबई पालिकेची एकहाती सत्ता ठेवणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांच्या घरातील माणूस गेली अनेक वर्षे पालिकेत महापौर पदावर विराजनमान आहे. पाहिले महापौर म्हणून विद्यमान महापौर सागर नाईक यांचे चुलत बंधू खासदार डॉ. संजीव नाईक यांनी सहा वर्षे महापौरपद भूषविले. त्यांचे दिवगंत काका तुकाराम नाईक यांनी एक वर्षे महापौरपद सांभाळले. नाईक कुटुंबातील या दोन्ही महापौरांना शक्य झाले नाही ती बाब शुक्रवारी महापौर सागर नाईक यांनी करुन दाखविली. बेशिस्त सभागृहात वावरणाऱ्या नगरसेवकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी नगरसेवकांची नावे बाकावर टाकून त्यांना त्याच जागेवर बसणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यामुळे मागील १७ वर्षांत न झालेली गोष्ट पालिकेत झाली.
नगरसेवकांना सकाळी सव्वाअकरा वाजता सभागृहात आल्यानंतर आश्र्ययाचा धक्का बसला. नेहमीच्या ठिकाणी बसून गप्पाचा फड सुरू ठेवणाऱ्या नगरसेवकांची ताटातूट या आसनव्यवस्थेमुळे झाली होती. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू झाला होता. ही काय शाळा आहे का, असा त्यांचा सवाल होता. यावरून काही काळ गदारोळ झाला. महापौरांनी सरळ मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ चे पुस्तक सभागृहात झळकाविले. सभागृहाची आसनव्यवस्था ठेवण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आल्याचे या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. त्या मुळे नगरसेवकांची बोलती बंद झाली.  बसण्याचे काही नियम नसल्याने नगरसेवक आपल्या मर्जीतील जागेवर ऊठ बस करीत होते. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसल्याचे महापौरांनी सांगितले. ही आसनव्यवस्था करण्यापूर्वी महापौरांनी प्रत्येक पक्षाच्या प्रतोदांकडे विचारणा केली होती. त्या प्रमाणे त्यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परीक्षेच्या पेपरला बसावे त्या प्रमाणे आज बाकावर नाव बघितल्यानंतर नगरसेवकांना मनोमन वाटले. यात सभागृह नेते व पक्षाच्या प्रतोद यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक पिछाडीवर गेले. माहिलांना या आसनव्यवस्थेत पहिले स्थान देण्यात आले आहे, हे विशेष.

Story img Loader