महाराष्ट्र प्राध्यापक संघाने वर्तमान संपापासून माघार न घेण्याचे ठरविल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उद्या, २३ मार्चपासून सुरू होणार असलेल्या अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील कठाळे यांच्या नेतृत्त्वात प्र-कुलगुरू डॉ. महेश येंकी यांना आज निषेधाचे निवेदन दिले. सात दिवसात परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर न झाल्यास अभाविपतर्फे विद्यापीठाविरुद्ध मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे नागपूर विद्यापीठाच्या ४८ परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या असून त्यांचा कार्यकाळ विनाकारण वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा हा निर्णय असून विद्यापीठाने तो त्वरित मागे घ्यावा आणि संपकर्त्यां प्राध्यापकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अभाविपच्या शिष्टमंडळाने केली. अभाविपच्या शिष्टमंडळात नागपूर महानगर मंत्री अमेय विश्वरूप, अनुराग रिसालदार, गौरव शेवडे, अभिजित वडनेरे, कौस्तुभ तिमांडे आदींचा समावेश होता. विद्यापीठाने परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित न करता पुढील सात दिवसात नवे वेळापत्रक जारी करावे, बहिष्कार आंदोलनातील सहभागी प्राध्यापकांवर कारवाई करावी, वेळापत्रकातील वारंवार बदलाचा निकालावर परिणाम होऊ नये, निकाल ठरलेल्या वेळेतच लावण्यात यावे, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. डॉ. महेश येंकी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. संपकरी प्राध्यापकांवरील कारवाईचा प्रस्ताव महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उच्च व तंत्र शिक्षण खात्याला पाठविण्यात येईल तसेच परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ. येंकी यांनी सांगितले. प्राध्यापकांचा संप लवकर संपणार नसल्यास पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या मदतीने परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे संकेत डॉ. येंकी यांनी दिले.

Story img Loader