श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात गुरुवारी सहाव्या माळेदिवशी शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. दुपारी १२ वाजता भक्तीमय वातावरणात धुपारती निघाली. आरतीनंतर अंगाऱ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सहाव्या माळेदिवशी शिस्तीत दर्शन होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मध्यरात्रीनंतर महंत तुकोजीबुवा व महंत चिलोजीबुवा यांनी देवीची चरणतीर्थ पूजा केली. चरणतीर्थ मंडळाच्या भक्तांनी विष्णुदासांच्या रचनांचे गायन केले. टाळ व टाळ्यांचा गजर करीत सर्व भक्त या पूजेत भक्तिभावाने सहभागी झाले होते. पुजारी दिलीप कदम, प्रमोद कदम आदींनी भाविकांना आशीर्वाद दिले. त्यानंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. भवानीमातेचे अलंकार व मूर्तीची सजावट झाल्यानंतर देवीच्या मूर्तीभोवती प्रतिकात्मक नाग व त्याने मूर्तीला तीन पदरी वेढा दिल्याचा देखावा मांडण्यात आला. नागाच्या शेजारी विष्णुदेवाची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली. त्यासोबत गुलाबी रंगाचे कमळही ठेवले होते. सोन्याने मढलेले देवीचे दोन हात दाखवून देवी पूर्णत शेषशाही रूपात दिसावी, याची खबरदारी घेतली होती. देवीचे हे रूप पाहण्यासाठी सहाव्या माळेदिवशी सुमारे एक लाखावर भाविकांची गर्दी होती. नवरात्र काळात पाचव्या व सहाव्या माळेला प्रतिवर्षी ५ ते ७ लाख भाविकांची गर्दी असते. मात्र, अचानक पाचव्या माळेपासून भाविकांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी सात वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला. या वेळी महाराष्ट्रासह कर्नाटकचे भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याच्या अनेक भागातील भाविक मोठय़ा प्रमाणात चालत देवीदर्शनास आले होते. चौथ्या माळेपासून उस्मानाबाद व बीडच्या भाविकांनी चालत येत खेटा पोहोच केला. तीन दिवसांपासून लातूर मार्गावरूनही चालत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. हा रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. कर्नाटकातून मागील १० दिवसांपासून मंद गतीने सुरू असलेल्या भाविकांची संख्या आता वाढू लागली आहे.
मात्र, दरवर्षीच्या तुलनेने यंदा नवरात्रोत्सवात सहाव्या माळेदिवशी मर्यादित भाविकांची संख्या होती. भाविकांची संख्या रोडावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाविकांच्या घटत्या संख्येचा सर्वाधिक फटका तुळजापुरातील व्यापाऱ्यांना बसला असून, चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे यंदा गर्दी कमी दिसून येत असल्याचेही व्यापारी सांगत आहेत.