विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात होण्याआधीच प्रगत माध्यमांद्वारे अपप्रचारास सुरुवात झाली असून, मनसेचे विद्यमान आमदार वसंत गीते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा खोडसाळ संदेश ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर टाकला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गदारोळ उडाला. हा संदेश टाकताना एका वृत्तवाहिनीच्या नावे बनावट बातमीही तयार करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी बदनामी करण्याचे हे षड्यंत्र रचले असून, पोलीस यंत्रणेने हा संदेश टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. गीते यांनी केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत असताना व्हॉट्स अ‍ॅपसह अन्य माध्यमांवर प्रचारासोबत अपप्रचाराला सुरुवात झाल्याचे या घटनेने दर्शविले आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गीते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा खोडसाळ संदेश अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी रात्री व्हॉट्स अ‍ॅपवर टाकल्याचे सांगितले जाते. गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर हा संदेश व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता. या घटनाक्रमामुळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ उडाला. सकाळपासून आ. गीते यांचा भ्रमणध्वनी खणखणू लागला. काहींनी गीते यांच्या निवासस्थानी व मनसेच्या कार्यालयात धाव घेऊन विचारणा केली. त्या संदेशात कोणतेही तथ्य नसून आपण मनसेमध्ये असल्याचे आ. गीते यांना प्रत्येकाला सांगावे लागले.
या घटनाक्रमानंतर आ. गीते यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. व्हॉट्स अ‍ॅपवर खोडसाळ संदेश टाकून बदनामी केल्याची तक्रार आ. गीते यांनी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधकांचे हे षड्यंत्र
काही दिवसांपासून आपण प्रचाराला सुरुवात केली आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर खोडसाळ संदेश टाकून विरोधकांनी बदनामीचे षड्यंत्र रचले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोषींचा शोध घेऊन कारवाई करावी. आपण मनसेमध्ये असून व्हॉट्स अ‍ॅपवरील तो संदेश निराधार आहे. आ. वसंत गीते

आक्षेपार्ह संदेशांवर तांत्रिक विश्लेषण कक्षाची नजर
निवडणूक काळात आक्षेपार्ह संदेश वातावरण गढूळ करण्यास कारणीभूत ठरतात. अशा संदेशांवर नजर ठेवण्याबरोबर त्याबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण कक्षाची स्थापना केली आहे. प्रचारासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून पारंपरिकसह आधुनिक माध्यमांचा वापर केला जातो. सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ही धडपड केली जात असली, तरी काही अनिष्ट प्रवृत्ती याच माध्यमांचा अपप्रचार करण्यासाठी वापर करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह लघुसंदेशाचा विषय बराच गाजला होता. आक्षेपार्ह लघुसंदेश पाठवून प्रतिस्पर्धी उमेदवाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार काहींनी केली होती. या पाश्र्वभूमीवर पोलीस यंत्रणेने आक्षेपार्ह लघुसंदेश पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण विभागात खास कक्ष कार्यरत असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख मधुकर कड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणाच्याही भ्रमणध्वनीवर या स्वरूपाचा लघुसंदेश प्राप्त झाल्यास तो संदेश आणि ज्याने तो पाठविला आहे, त्याच्या माहितीसह या विभागाकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भ्रमणध्वनीधारक आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’चाही मोठय़ा प्रमाणात वापर करतात. संदेश देवाण-घेवाणीचा कट्टा असे त्याचे स्वरूप. व्हॉट्स अ‍ॅपवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संदेश अविरतपणे फिरत असल्याचे सांगण्यात येते. त्यावरही या विभागाची नजर राहणार आहे.

Story img Loader