देशाची विजेची निर्मिती व मागणी सतत वाढती आहे. त्यामुळे देशात विजेची तूट न भरून निघणारी आहे. त्यामुळेच अणुऊर्जेच्या माध्यमातून विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. येथील कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत नोंदविले.
प्रगत देशात जीवनमानासाठी ५ हजार युनिट दरडोई विजेची गरज असते. चीनमध्ये ती सद्यस्थितीत निम्मी आहे. आपल्या देशात दरडोई विजेची उपलब्धता कमी असल्याने ती वाढविण्याची गरज आहे. देशाच्या सर्वागिण विकासाबरोबर विजेच्या मागणीत देखील वाढ होत असते. जगाच्या गरजांपेक्षा भारताची ऊर्जेची गरज अधिक असल्याचे मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात सामान्य व्यक्तींमधील समज-गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. समज-गैरसमज निर्माण करणे हा राजकारणाचा भाग असू शकतो. तो दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशात विजेची मागणी वाढती आहे. त्याचबरोबर देशात विजेची निर्मिती देखील सतत वाढत आहे. असे असताना वाढत्या लोकसंख्येमुळे मागणी व पुरवठा यातील तफावत देखील दिवसेंदिवस वाढत राहील, असे सुतोवाच डॉ.काकोडकर यांनी केले.
अणुशास्त्रज्ञांनी मदत करून देशात ४१ राष्ट्रीय मानांकित बियाण्यांची निर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला. आजच्या स्थितीत देशात अन्नसुरक्षेबरोबर न्यूट्रिशनल अर्थात, पौष्टीक आहाराची मागणी वाढत असल्याचे मत त्यांनी नोंदविले. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्राबरोबर सर्वानीच यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजन वेळूकर, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते, संशोधन संचालक डॉ.शिवाजी सरोदे यांची उपस्थिती होती. 

Story img Loader