नरभक्षक बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असल्याने व आज आणखी एका महिलेचा बळी गेल्याने वीस दिवसापासून पिंजऱ्यात अडकून पडलेल्या तीन बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, मुंबई येथील पशुवैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉ. विनया डांगले यांनी आज येथे बिबटय़ाला मायक्रोचिप योग्य पध्दतीने लागल्या की नाही, याची पाहणी केली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये नरभक्षक बिबटय़ाने धुमाकूळ घालून नऊ लोकांचा बळी घेतला. बफर झोनमधील गावकऱ्यांनी बिबटय़ाला जेरबंद करा नाही तर आम्हीच त्याला ठार करू, अशी धमकी देताच वनखात्याने पिंजरे लावून बिबटय़ांना जेरबंद केले. त्यानंतरही घटना घडल्याने वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांनी बिबटय़ाला गोळय़ा घालण्याचे निर्देश दिल्यानंतर एकही घटना घडलेली नव्हती. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पिंजऱ्यात अडकून पडलेल्या बिबटय़ांपैकी नरभक्षक शोधून दोन बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्याचा विचार सुरू होता. त्यासाठी वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी रामबाग नर्सरीतील विश्रामगृहात झाली. या बैठकीत या विषयावर साधकबाधक चर्चा झाली. पिंजऱ्यात अडकून पडलेल्या तिन्ही बिबटय़ांना मायक्रोचिफ लावण्यात आली आहे. मात्र, दोन बिबट सोडायचे असल्याने त्यांना सहा लाख खर्च करून रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे.
बिबटय़ाला निसर्गमुक्त करण्यापूर्वी गावकऱ्यांचे मत विचारात घ्या, अशी सूचना काहींनी केल्याने तसा निर्णय घेण्याचे ठरले असतांनाच आज बिबटय़ाने एका मनोरुग्ण महिलेचा बळी घेतला. त्यामुळे आता बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. विशेष म्हणजे, पिंजऱ्यात अडकून पडलेल्या बिबटय़ांपैकी नेमका कोणता बिबट नरभक्षक आहे, याचाही शोध अजून लागलेला नाही. त्यामुळे आता या बिबटय़ांचे आणखी महिनाभर पालन पोषण करण्याची जबाबदारी वनखात्यावर आली आहे. दरम्यान, आज मोहुर्ली येथील प्राणी बचाव केंद्रात येऊन मुंबईच्या प्रसिध्द पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणी तज्ज्ञ डॉ.विनया डांगले व नागपूरच्या डॉ.चित्रा राऊत यांनी बिबटय़ाच्या प्रकृतीची पाहणी केली. तिन्ही बिबटय़ांना योग्य पध्दतीने मायक्रोचिप लागल्या की नाही, त्या चिप लावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली की नाही, याचीही तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कडूकर, वनपरिक्षेत्राधिकारी अरुण तिखे व वनखात्याचे इतर अधिकारी हजर होते. साधारणत: आणखी आठवडय़ाभरानंतर या बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जेरबंद बिबटय़ांना सोडण्याचा निर्णय लांबणीवर, मायक्रोचिप लावल्या
नरभक्षक बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असल्याने व आज आणखी एका महिलेचा बळी गेल्याने वीस दिवसापासून पिंजऱ्यात अडकून पडलेल्या तीन बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, मुंबई येथील पशुवैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉ. विनया डांगले यांनी आज येथे बिबटय़ाला मायक्रोचिप योग्य पध्दतीने लागल्या की नाही, याची पाहणी केली.
First published on: 08-05-2013 at 02:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in decision on releasing the leopards