शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी कल्याण-डोंबिवली महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा हिरमोड झाला आहे. निविदा प्रक्रियेत शालेय साहित्य अडकले असल्याने विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळण्यास ऑगस्ट महिना उजाडेल, अशी चर्चा आहे.  
अनेक विद्यार्थी नवीन गणवेश मिळणार म्हणून शाळेत पहिल्या दिवशीच मोठय़ा उत्सुकतेने उपस्थित होते. मात्र साहित्य मिळण्यास उशीर लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. शाळा सुरू झाली की पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, कंपासपेटी, बूट, पावसाळी झगा देण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प मंजूर करताना घेण्यात आला होता. शालेय साहित्य खरेदीसाठी अर्थसंकल्पात अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वेळेत सगळ्या मंजुऱ्या देऊनही विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यासंबंधी शिक्षण मंडळातील सूत्रांकडे विचारणा केली असता, त्यांनी शालेय साहित्य खरेदी करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप काही नगरसेवकांकडून करण्यात आला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला. नव्याने निविदा प्रक्रिया मागवून साहित्य मागवण्यात येणार आहे. प्रशासनाधिकारी सुरेश अवारे यांनी ठेकेदाराने निकृष्ट साहित्य पुरवल्याने त्याचा ठेका रद्द केला. नवीन साहित्य मागवण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येऊन विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा