घरातील कर्त्यां व्यक्तीचे निधन झाल्यावर वारसदारांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम किंवा कुटुंबनिवृत्तीवेतन मिळविण्यासाठी संबंधिताचा मृत्यू दाखला आवश्यक असतो. पण महापालिकेच्या ढिसाळ आणि भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे त्यास विलंब लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबई विभागीय कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी पुढाकार घेतला असून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले आहे.
हजारो भविष्यनिर्वाह निधी किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देण्यासाठी अभिनव योजना सुरू केलेल्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के.एल. गोयल यांनी अडचणीत सापडलेल्या आणि पैशांची तातडीने गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. निधन झालेल्या कर्त्यां पुरुषाची पत्नी आणि २५ वयापर्यंतच्या मुलांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळू शकते. पण कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी खातेधारकाचा मृत्यूदाखला गरजेचा असतो. तो न मिळाल्याने प्रकरणे रखडत आहेत. ही बाब लक्षात येताच गोयल यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या बाबीमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
वास्तविक एखाद्याचे निधन झाल्यावर एक आठवडय़ाच्या आत मृत्यूदाखला मिळणे अपेक्षित असते. पण गरजूंकडून पैसे उकळण्यासाठी महापालिका कर्मचारी त्यांची अडवणूक करून मृत्यू दाखल्यास उशीर लावतात. मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार होऊ नये, यासाठी आता आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

Story img Loader