येथील वयोवृद्ध निराधार तसेच निराश्रित कलाकारांना शासनातर्फे देण्यात येणारे मानधन मिळण्यास विलंब होत आहे. या संदर्भात विचारणा करणाऱ्या कलावंतांना जिल्हा परिषदेतील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. या एकूणच प्रकाराने कलाकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जळगाव शहरातील कलाकारांना राज्य शासनाकडून दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, ते दरमहा याप्रमाणे दिले जाते. मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहा हजार रुपयांचा एक टप्पा व दिवाळीच्या दरम्यान दुसरा टप्पा असे प्रत्येकी सहा हजार रुपये वितरित केले जातात. तथापि, गेल्या दिवाळी दरम्यान कलाकारांना केवळ तीन हजार रुपयेच मिळाले. उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेतील संबंधित विभाग कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांच्याकडून अरेरावी व अपमानास्पद वागणूक मिळते असे त्रस्त कलाकारांनी सांगितले. निराधार, निराक्षित व वयोवृद्ध कलाकार शासकीय अनुदानावर गुजराण करतात. पण, तोच पैसा हाती पडत नसल्याने त्यांची अवस्था गंभीर आहे. त्यात कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची व्यथा अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader