भाजप प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लांबल्याने अकोला जिल्ह्य़ातील शहर व जिल्ह्य़ाची कार्यकारिणीची घोषणा रखडली आहे. शहर व ग्रामीण अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर कार्यकारिणी घोषित होण्यास झालेला विलंब पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. शहर व ग्रामीणची कार्यकारिणी निश्चित करताना पक्षात विशिष्ट आमदाराची मर्जी राखली जात असून इतरांना अंधारात ठेवण्याचा प्रकार पक्षात होत असल्याची माहिती मिळाली.
रखडलेल्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षात गटबाजीला चालना देण्यात येत आहे. यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीची वाट पाहिली जात आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या मर्जीतील लोकांची कार्यकारिणीत वर्णी लागावी, यासाठी कार्यकारिणीची घोषणाही थांबली आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या प्रदेशाध्यक्षांच्या गटातील नियुक्तया करण्याची व्यूहरचना असून या माध्यमातून थेट प्रदेशाध्यक्षांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी चढाओढ सुरू आहे, तसेच शहर व ग्रामीण भाजप कार्यकारिणी नियुक्ती करताना विशिष्ट आमदाराला विश्वासात घेणे व काहींना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
 जिल्हा परिषद निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असून त्या दृष्टीने संघटनात्मक पकड मजबूत असण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत मतदार संघात निवडणूक न जिंकलेल्या नेत्याच्या हातात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्ष सोपविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे गेल्या वेळी पक्षाचा झालेला दारुण पराभव यंदा कायम राहणार असल्याचे सुतोवाच पक्षातील ज्येष्ठांनी विश्वासाने व्यक्त केला. जिल्हा परिषदेतील  पक्षाच्या सदस्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला वेळोवेळी मुठमाती दिल्याने जिल्हा परिषदेतील पक्षाचे नेतृत्व संपल्याचे चित्र आहे. त्याच वेळी महापालिकेतील नगरसेवकांना ग्रामीण नेतृत्वाचा नाहक जाच सहन करावा लागत असल्याची ओरड पक्षात आहे.
जुन्या शहरातील गजबजलेल्या जयहिंद चौकात भाजपच्या एका कार्यक्रमाकडे जनतेने फिरवलेली पाठ पक्षासाठी चिंतनीय ठरत आहे. या सर्व गोष्टींवर पक्षातील संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांचे दुर्लक्ष असून इतर पक्षांनी जिल्हा परिषद व लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून भाजप यात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

Story img Loader