सांगलीतील शिवाजी मंडईनजीक असलेल्या रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने होणारा विरोध मोडून उद्ध्वस्त केले. आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर ही पहिलीच ठोस कारवाई सांगलीकरांच्या समोर आली आहे. तीस वर्षांनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
शिवाजी मंडई परिसरात वाहतुकीस असणारा रस्ताच विक्रेत्यांनी व्यवसायासाठी अतिक्रमित केला होता. पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेचे पथक अतिक्रमण हटविण्यास गेले असता भाजीपाला विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने मोहीम स्थगित करण्यात आली होती.  भाजपचे आमदार संभाजी पवार यांनीही या कारवाईस विरोध केला होता.
महापालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी गुरुवारी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकासह पोलीस बंदोबस्तात या ठिकाणचे अतिक्रमण काढून जप्त केले. या वेळी या पथकाला विरोध करणाऱ्या पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन िशदे यांनीही या मोहिमेस विरोध केला. मात्र हा विरोध डावलून पथकाने अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पाडली.  
महापालिकेतील स्वाभिमानी आघाडीचे नेते शिवराज बोळाज, नगरसेवक गौतम पवार, बाळासाहेब गोंधळी, अश्विनी खंडागळे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात लेखी आदेश आहे का अशी विचारणा केली. मात्र पथकाने उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
कारवाईनंतर संतप्त झालेल्या महिला विक्रेत्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. काही काळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून व्यक्तिगत नुकसान करणाऱ्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला असून, भाजी विक्रेत्याला आठ दिवसांत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.  अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.