महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी संपूर्ण राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अनेक त्रुटी असून ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांकरिता ४५ तर सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के गुण ठेवण्याची मागणी भाजपचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष के. बी. साळुंखे यांनी केली आहे.
टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एक आणि दोन यात विचारलेल्या प्रश्नांमध्ये बऱ्याच प्रमाणात त्रुटी आहेत. विचारलेल्या प्रश्नाची अनेक उत्तरे निघत असल्याने प्रश्नाचे उत्तर नेमके कोणते, यासंदर्भात संभाव्य उत्तर सूची तपासली असता एका उत्तरापेक्षा जास्त उत्तरांची नोंद आढळून आल्याचे साळुंखे यांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्नांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रश्नपत्रिका एकमध्ये १२ तर प्रश्नपत्रिका दोनमध्ये १३ प्रश्न चुकीचे आढळून आले आहेत. या परीक्षेत शिक्षण पदविका परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. मागासवर्गीयांसाठी ५५ टक्के आणि सर्वसाधारण वर्गासाठी ६० टक्के गुण या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून मागासवर्गीयांसाठी ४५ तर सर्वसाधारण वर्गासाठी ५० टक्के गुण पात्रतेसाठी योग्य समजण्यात यावेत, अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे. चुकीच्या प्रश्नांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्याकडेही साळुंखे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Story img Loader