बनावट पावत्यांच्या आधारे जकात चुकवून मुंबईत माल आणणाऱ्या कंपन्यांना मोकाट सोडून दलालांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र विधी समितीच्या बैठकीत प्रशासनाचा निषेध करीत दलालांबरोबर जकातबुडव्या कंपन्यांविरुद्धही कारवाईची करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
हाय पॉइंट सर्विस इंडिया, लॉरियल इंडिया, इंडियन सेल्युलर आदी कंपन्यांनी आपला माल मुंबईत पाठविला होता. या मालाची जकात नाक्यावर तपासणी केली असता जकातीच्या पावत्या बनावट असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी केलेल्या चौकशीत दलाल बाबाजी शिवराम यांनी या पावत्या दिल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बनावट पावत्या देणाऱ्या दलालाबरोबरच कंपन्याही दोषी असून त्यांच्याविरुद्धही पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केली. पालिकेने न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्रात दलालाइतकीच कंपन्याही जबाबदार असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे कंपन्यांकडूनही जकात कराच्या दहापट दंड वसूल करावा, असे ते म्हणाले.
लॉरियल इंम्डिया कंपनीने काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मुंबईत माल आणला होता. त्यावेळी त्यांना ८० कोटी रुपये दंड ठोठावला होता. मात्र प्रशासनाने दंडवसुली केली नाही. आताही या कंपनीने बनावट पावत्यांच्या आधारे मुंबईत माल आणला असून सुमारे ३० कोटी रुपये दंड होऊ शकतो. या कंपनीवर प्रशासनाची खास मर्जी असल्यामुळे सुमारे ११० कोटी रुपयांचा महसूल सोडण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. जकात चोरी करून आणलेला माल जप्त करून ट्रक सोडून देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाने ट्रक ताब्यात ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader