जिल्ह्यातील टंचाईग्रस्त परिस्थितीमुळे सर्वच धरणांमध्ये अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक राहिला असून त्यामुळे धरणांमध्ये किती गाळ साचला आहे, हेही समोर आले आहे. धरणे गाळाने भरल्याने जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार नितीन भोसले यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली होती. परंतु जिल्ह्यातील धरणांमधून अहमदनगर व मराठवाडय़ाकरिता पाणी सोडण्यात येत असल्याने धरणांमधील जलसाठा कमी झाला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिन्यांचा अवधी असल्याने तोपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरविण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. धरणांमधील जलसाठा कमी झाल्याने गाळ किती आहे ते दिसू लागले आहे. बहुतांशी धरणांमध्ये कितीतरी अधिक गाळ साचल्याने आपोआपच त्यांची जल क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात त्यामुळेच कमी पाऊस झाल्यावर देखील धरण भरण्यास वेळ लागत नाही.
परंतु गाळ हा धरण भरण्यातील मुख्य घटक आहे, हेही विचारात घेण्याची आवश्यकता आहे. धरणांमधील जलसाठय़ात वाढ होण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा गाळ काढण्याची गरज आहे. धरणांमधील गाळ काढल्यास जलस्रोतांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन जल साठवण क्षमतेत वाढ होऊ शकेल. धरणांमधून काढण्यात आलेल्या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता येऊ शकेल, असेही आ. भोसले यांनी म्हटले आहे.
धरणांमधील गाळ शेतीत पसरविल्यास शेती सुपीक होण्यास मदत होऊ शकते. शिल्लक असलेल्या दीड महिन्यात हे काम करणे सहजशक्य असल्याचे आ. भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
धरणांमधील गाळ काढल्यास त्यांची जलक्षमता वाढून पुढील काही वर्षे तरी टंचाईपासून जिल्ह्याची सुटका होऊ शकेल.
पुढील पाच वर्षांसाठी जिल्ह्यात कोणत्याही धरणाच्या निर्मितीस मंजुरी न देता आहे त्या धरणांमधील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच त्यासंदर्भात त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार भोसले यांनी केली आहे.