महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरसह पुण्याकडे जा-ये करण्यासाठी अस्तित्वातील धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रवाशांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ देणे शक्य असल्याची भूमिका लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली आहे. रेल्वे सेवेत काहीसा आणि कमी खर्चात होणारा बदल केल्यास मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गाआधीच लाखो जणांना धुळे-चाळीसगाव किंवा थेट मनमाड पर्यंतची रेल्वे सेवा समाधान देणारी ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ मंत्री माणिकराव गावित यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची गरज व्यक्त केलीच पण, धुळे-चाळीसगाव या अस्तित्वातील रेल्वे मार्गावरूनच प्रवाशांना देशभरात सेवा देता येऊ शकेल, असे सांगितले. धुळे हे मुख्यालयाचेच ठिकाण असल्याने आणि धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर किंवा साक्री हा भाग नंदुरबार या आपल्याच मतदार संघात असल्याने साहजिकच आपण या विषयाकडे लक्ष घातले आहे. धुळे-मुंबई अशी स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू करणे किंवा या मार्गावरून अन्य ठिकाणी-जाण्या-येण्यासाठी चाळीसगाव किंवा मनमाड येथून सुविधा करणे यासाठी रेल्वे खात्याच्या वरिष्ठांसह रेल्वे मंत्रालयाकडेही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी धुळे-चाळीसगाव हा मार्ग जसा महत्वाचा आहे तेवढाच धुळे-नरडाणा हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. धुळे-चाळीसगाव किंवा धुळे – मनमाड अशी सेवा द्यायचे म्हटले तर पुढच्या स्थानकावर थांबा घेणाऱ्या अन्य एक्स्प्रेस गाडय़ांची वेळ पाहून रोजची सेवा सुरू व्हावी, त्यामुळे प्रवाशांची सोय होईल.
आ. जयकुमार रावल यांनी रेल्वेमार्गासंदर्भात ‘नाशिक व उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त’ ने आवाज उठविल्यामुळे हा विषय चर्चेत आल्याचे सांगितले. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन चाळीसगाव किंवा मनमाड पर्यंतची अपेक्षित सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले तरच ते शक्य होईल. धुळ्याहून किमान चार ते पाच वेळा चाळीसगाव किंवा मनमाडपर्यंतची गाडी हवी. आ. काशिराम पवार यांनी मनमाड-इंदूर असो की धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गातील मागण्या असोत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. चार-दोन मागण्या मान्य झाल्यानंतर पुढे आणखी काही पदरात पाडून घेता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. खान्देश औद्योगिक विकास संघटनेचे सचिव भरत अग्रवाल यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गापेक्षा धुळे-चाळीसगाव या रेल्वे सेवेत सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली. कोणत्याही प्रवाशाला थेट सीएसटी पर्यंत जाता येत नाही. आधी सीएसटी पर्यंत पोहोचण्याची सोय व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

Story img Loader