शहराचा पाणीप्रश्न, नागरी सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता यांसह शहर विकासाच्या सर्वच मुद्दय़ांवर अपयशी ठरलेली भ्रष्ट मनमाड नगरपालिका त्वरित बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पालिकेत तीन वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पालकमंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळात असल्याने पालिकेच्या समस्या सुटण्यास मदत होईल ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. चार वर्षांपासून शहराचे सर्व प्रश्न जैसे थे आहेत. उलट शहरात भर पावसाळ्यातही मनमाडकरांना २० दिवसांआड नळाव्दारे पाणी मिळत आहे. त्यातच रस्त्यांची बिकट अवस्था, अस्वच्छता यांचा मोठय़ा प्रमाणात जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव झाला असून आजारांमुळे शहरातील दवाखाने तुडुंब भरलेली दिसतात. नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कामगार यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही.
सावित्रीबाई फुले भाजी बाजारचे काम चार-पाच वर्षांपासून अर्धवट आहे. पालिकेत भ्रष्ट कारभार सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. पालिकेच्या गाडय़ांना इंधनही कोणी देत नाही. त्यामुळे ही पालिका त्वरित बरखास्त करण्याची मागणी छाजेड यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

Story img Loader