अनेक वर्षांपासून अनागोंदीमुळे सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकच्या धान्य वितरण व पुरवठा कार्यालयाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा सर्वासमोर आला असून शिधापत्रिकांवर डोळे झाकून स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच सेतू कार्यालयातील गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी दलित-मुस्लीम क्रांती मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
धान्य वितरण कार्यालयात दलालांच्या साहाय्याने कोणतेही काम केले जाऊ शकते, असा दावाही मंचने केला आहे. अधिकारी व दलाल गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना वेठीस धरतात. त्यामुळे गोरगरिबांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत असून त्याविरोधात विविध पक्ष, संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करूनही कारवाई झाली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. इतर राज्यातील उच्चपदस्थांच्या नावे शिधापत्रिका तयार करण्याचा प्रकार म्हणजे धान्य पुरवठा वितरण कार्यालयात कशा पद्धतीने कारभार सुरू आहे, त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी व सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत चौकशी न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दलित-मुस्लीम क्रांती मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

Story img Loader