दुष्काळामुळे व्यवसाय मंदावल्याने वार्षिक शुल्क माफ करावे अशी मागणी राज्य एसटी कॅन्टीन व स्टॉल परवानाधारक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयावरील चर्चेसाठी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या (दि.७) औरंगाबाद येथे होत आहे.
संघटनेचे सरचिटणीस अशोक देसाई व नगर बसस्थानकातील माऊली एजन्सीचे संचालक सुभाष भांड यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद येथील सिडको बसस्थानकाजवळच्या एलोरा हॉल येथे उद्या दुपारी २ वाजता ही बैठक होणार आहे. भांड यांनी सांगितले की राज्यात जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, लातूर, बीड, नगर, सोलापूर येथे दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वच कॅन्टीन व स्टॉल धारकांचा व्यवसायही कमी झाला आहे. त्यामुळे या भागातील स्टॉल्स व कॅन्टीन यांचे वार्षिक शुल्क माफ करावे असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर एसटी बसस्थानकांचे खासगीकरणातून होणारे बांधकाम याही विषयावर बैठकीत चर्चा होईल. राज्यातील बसस्थानकांमधील गाळेधारकांच्या अनेक समस्या आहेत. त्यावर विचारविनीमय करण्यात येणार आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन देसाई, भांड तसेच सुरेंद्र अग्रवाल, दत्ता कुलकर्णी, प्रदीप काटकर, युनूस मुजावर, सुभाष जाजू आदींनी केले आहे.

Story img Loader