राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी राज्य पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विभाजन समितीच्या प्रत्येक जिल्ह्य़ात बैठका सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर नव्याने निर्माण होणारे स्वतंत्र कृषी विद्यापीठ खान्देशात म्हणजेच धुळे जिल्ह्य़ात व्हावे, अशी मागणी आ. प्रा. शरद पाटील यांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विद्यापीठ आहे. सदर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्य़ांमध्ये आहे. कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात हवामान व पीक पद्धतीनुसार विविध पिकांचे संशोधन केंद्र व कृषी महाविद्यालये आहेत. अलीकडे कराड व नंदुरबार येथेही पदवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
आता हवामानातील झालेला बदल व जमिनीची सुपीकता कमी झाल्याने संपूर्ण पीक पद्धतीमध्ये बदल होत आहेत. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कार्यक्षेत्रात पुनर्बाधणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
खान्देश विभागाकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठाची गरज असून त्याचे मुख्यालय धुळे येथे व्हावे, असा मुद्दा आ. पाटील यांनी मांडला आहे. धुळे कृषी महाविद्यालयाकडे विद्यापीठास आवश्यक जमीन उपलब्ध आहे, वाढीव जमीन लागल्यास धुळे जिल्ह्य़ात ५० किलोमीटरवर भरपूर जमीन उपलब्ध आहे.
धुळे कृषी महाविद्यालयाकडे प्रत्येक विभागाचे प्रमुख व त्यांच्या स्वतंत्र इमारती उपलब्ध आहेत. कमी खर्चात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने कृषी विद्यापीठ धुळे येथे सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही. शिवाय मनमाड-नरडाणा-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. तापी नदीमुळे पाण्याची समस्या नाही. सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना मंजुरीच्या मार्गावर आहे. या सर्व बाबी लक्षात घेता धुळे येथे खान्देश कृषी विद्यापीठ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा