देऊळगावराजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध विकास योजनेतंर्गत गोडाऊन, अ‍ॅक्शन शेड, काँक्रिट रस्ता व शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. परंतु, यात संबंधित ठेकेदार व बाजार समिती सचिव हे संगनमत करून प्रचंड भ्रष्टाचार करीत असल्यामुळे बांधकामाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी केली आहे.
बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा देण्यासह त्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने विविध योजनेतंर्गत ३.५ कोटी रुपयांच्या विविध बांधकामांना मंजुरी दिली आहे. त्यात १ कोटी ७१ लाख ३५ हजार रुपये खर्चाचे गोडावून बांधकाम व अ‍ॅक्शन शेड, तर दुसऱ्या बाजूला बांधण्यात येत असलेल्या गोडावून व अ‍ॅक्शन शेडसाठी २ कोटी ३२ लाख ३९ हजार रुपये, युसीआर ड्रेन बांधकाम १० लाख ६२ हजार, गोदामातील विद्युतीकरणासाठी ९ लाख ९५ हजार रुपये, कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी १ कोटी २६ लाख १६ हजार रुपये, शौचालय बांधकामासाठी ६ लाख ४६ हजार रुपये या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण बांधकामाचा ठेका अग्रवाल व श्रृती कंन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे, परंतु सुरुवातीपासूनच या बांधकामाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे या बांधकामासाठी वाळू येथे कोठून आणावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पैशाच्या लालसेने संबंधित ठेकेदार मातीमिश्रित वाळूचा उपयोग करीत असून सिमेंट व लोखंडही नित्कृष्ट दर्जाचे वापरत आहे. एवढेच नव्हे, तर डांबरावर टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी भुकटीचा बांधकामासाठी वापर करण्यात येत आहे. बांधकामात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असतांना देखील बाजार समिती सचिव त्याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारात त्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बांधकामाची गुणनियंत्रकामार्फत तपासणी होईपर्यंत, हे बांधकाम बंद ठेवण्यात यावे, तसेच संबंधित ठेकेदारांना बांधकामाचे देयके देण्यात येऊ नये, अशी मागणी अरुण इंगळे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या २३ नोव्हेंबरला बाजार समितीच्या प्रशासकांनी सुध्दा या बांधकामाची तक्रार सचिवाकडे केली होती, परंतु या सचिवाने अद्यापही या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असल्याची शंका निर्माण होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा