लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून पराभूत झालेले आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांच्यामागील शुक्लकाष्ठ पराभवानंतरही कायम असून त्यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची तसेच निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी याच पक्षाचे माजी पदाधिकारी मुकुंद बेणी यांनी केली आहे. त्या संदर्भातील निवेदन त्यांनी निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांना दिले आहे.
पांढरे यांना लोकसभा निवडणुकीत आपली अनामतही वाचविता आली नाही. शासकीय सेवेत असताना त्यांनी विजय बळवंत पांढरे असे नाव लावले होते, तर निवडणूक अर्जात मात्र विजय बळीराम पांढरे असे नाव लावले. शासकीय सेवेतून निवृत्त होईपर्यंत व त्यानंतरही या दोन्ही नावांचा वापर करीत त्यांनी आपले सर्व व्यवहार सुरळीत पार पाडले आहेत. अशा पद्धतीने एकच व्यक्ती दोन नावाने कसा व्यवहार करू शकते, असा प्रश्न बेणी यांनी उपस्थित केला आहे. हे कायद्याच्या कोणत्याच कक्षेत बसत नसताना पांढरे यांनी आजवर शेतीचा सातबारा उतारा, त्यांची अनेक बँकांतील खाती, मालमत्ता, दूरध्वनी आणि इतर कामांसाठी सर्रासपणे दोन नावे वापरल्याचे उघड होत असल्याची माहिती बेणी यांनी दिली आहे.
निवडणुकीदरम्यान पत्रकार परिषदेत जाहीरपणे आपल्या नावावर फक्त दोन ते तीन लाख रुपये जमा असल्याचे सांगणाऱ्या पांढरे यांच्या एका पासबुकावर ३० लाखांचा आकडा कुठून आला, अशी शंका बेणी यांनी उपस्थित केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पासबुकाव्यतिरिक्त स्टेट बँक, आरटीओ कॉर्नर शाखा, नाशिक तसेच इंडियन ओव्हरसीज बँक, महात्मानगर, जळगाव, बुलढाण्यातील त्यांची बँक खाती तसेच या खात्यांवर आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या पासबुकांवर निवडणूक काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी करावी तसेच दोन्ही नावांचा वापर करून त्यांनी किती मालमत्ता जमा केली, याचाही शोध घेण्याची मागणी बेणी यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा