सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नाशिकरोड ते पंढरपूरमार्गे कोल्हापूर अशी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी श्रीपाद बेहरे यांच्यासह अनेकांनी केली आहे.
सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असल्याने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला झुकते माप देण्यात येईल, अशी महाराष्ट्रातील नागरिकांना आशा वाटत आहे. मागील अनेक रेल्वे अर्थसंकल्पांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून केल्या जाणाऱ्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. या पाश्र्वभूमीवर आणि सिंहस्थ कुंभमेळा चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने नाशिकसाठी विशेष रेल्वेगाडय़ांची भेट मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच बेहरे यांनी पंढरपूरकडून नाशिककडे येण्यासाठी एकही रेल्वेगाडी नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. कोल्हापूरमार्गे पंढरपूर अशी एक्स्प्रेस रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर केल्यास भाविकांची सोय होऊ शकेल. या मार्गावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत.या तीर्थक्षेत्राना जाण्यासाठी भाविकांची कायमस्वरुपी गर्दी असते. ही एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेला भूसंपादनादी बाबींना सामोरे जावे लागणार नाही. कारण रेल्वेमार्ग अस्तित्वात आहेच. नाशिकरोडपासून ही एक्स्प्रेस मनमाड-कोपरगाव-बेलापूर-अहमदनगर-दौंड-भिगवण-कुर्डुवाडी-बार्शी-मोडनिंब-पंढरपूर-कवठेमहंकाळ-मिरज-कोल्हापूर अशी जाऊ शकेल. त्यामुळे ही एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader