संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदायिनी मानल्या गेलेल्या उजनी धरणात यंदा पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने या धरणात पुणे जिल्हय़ातील धरणांतून पाणी सोडण्यात यावे. त्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
यंदाच्या वर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे या धरणात जेमतेम १६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. परंतु हा साठाही गेल्या दीड महिन्यात कमी होऊन सध्या केवळ हा पाणीसाठा केवळ पाच टक्के एवढाच शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हय़ावर जलसंकट कोसळले आहे. येत्या काही महिन्यांत पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची भीती आहे. तर याउलट, उजनी धरणाच्या वरच्या भागात पुणे जिल्हय़ातील १६ धरणांतील पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. प्राप्त परिस्थितीत सोलापूर जिल्हय़ातील पिण्याचे पाणी, शेतीच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पुणे जिल्हय़ातील धरणांतून आवश्यक पाणीसाठा उजनी धरणात सोडणे ही काळाची गरज असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितले. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करण्याची भूमिकाही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा माढा लोकसभा मतदारसंघ याच उजनी धरणाच्या पट्टय़ात असून त्याचा विचार करता सोलापूर जिल्हय़ातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पवार यांनीच आता स्वत: पुढाकार घ्यावा. उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्यासाठी पवार काका-पुतण्याचा आक्षेप असण्याचे कारण नाही, अशा शब्दांत घाटणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येत्या १० डिसेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात खासदार राजू शेट्टी हे सोलापूर जिल्हय़ातील पाणीप्रश्नावर दिशा ठरविणार असल्याची माहिती घाटणेकर यांनी दिली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी लोंढे, शिवाजीराव पाटील, किसन घोडके, मारुती नलवडे आदी उपस्थित होते.

Story img Loader