निळवंडे धरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कालव्यांची कामे निर्धारीत कालावधीतच पूर्ण करावी, त्यासाठी पुरेसा निधी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात विखे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामाला अंतिम स्वरुप येत असून, या धरणात आता पाणी साठविण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र लाभक्षेत्रातील तालुक्यांमधील कालव्यांची कामे राहिली आहेत. लाभक्षेत्रातील लोकांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होण्याच्या दृष्टीने कालव्यांची कामे तातडीने पुर्ण होणे गरजेचे आहे. अकोले तालुका वगळता इतर भागांमध्ये कालव्यांची कामे सुरु झाली असून, अकेाले तालुक्यात मात्र अद्यापि कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच तळेगाव, कोपरगाव शाखा व पुच्छ कालवा या शाखांच्या कालव्यांचीही कामे अद्यापि सुरु झालेली नाहीत. निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त असून, कालव्यांच्या कामांना गती दिल्यास या भागातील शेतकऱ्यांचे दैन्य कायमस्वरुपी दूर होणार आहे. पुर्णत्वाकडे जात असलेल्या प्रकल्पांना विशेषत्वाने निधी देण्याचे आपण सुचित केले आहे. त्यानुसार निळवंडे धरणाचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. त्यातील पाणी साठा केवळ कालवे नसल्याने लाभक्षेत्रापर्यंत पोहोचू शकत नाही.
राज्यातील आघाडी शासनाने सन २०१२ पर्यंतच धरण व कालव्यांची कामे पुर्ण करण्याबाबत सभागृहात व सभागृहाबाहेर आश्वसीत केलेले असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. निळवंडे प्रकल्पाच्या कामास गती देवून प्रकल्प कमीतकमी वेळेत पूर्ण झाल्यास आघाडी सरकारची ही मोठी उपलब्धी ठरेल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा