हमीपत्र लिहून न दिलेल्या प्राध्यापकांवर विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीने बुधवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्याकडे केली आहे. अशा प्राध्यापकांची नावे संकेतस्थळावर टाकावीत. त्यांचा सार्वजनिक सत्कार केला जाईल, असा टोलाही विद्यार्थ्यांनी लगावला आहे.
प्राध्यापकांच्या संपामुळे या वर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या ९६ व्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने प्राध्यापकांना कडक शब्दात फटकारले आहे. न्यायालयाने त्यांना अनेक आदेश, सूचना केल्या आहेत. त्यामध्ये प्राध्यापकांनी वैयक्तिक हमीपत्रावर परीक्षा व संबंधित कामांसाठी सहकार्य करण्याचे लिहून देणे बंधनकारक केले आहे. अशी कृती न करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठाने व महाविद्यालयाने कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे.
न्यायालयाच्या या आदेशाची शिवाजी विद्यापीठामध्ये कोणती स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीचे कार्यकर्ते आज कुलगुरूंना भेटले. त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन दिले. शिष्टमंडळात देवदत्त जोशी, प्रा. अमित वैद्य (अभाविप), भारत घोडके, मल्लीनाथ साखरे, रोहित पाटील, अवधूत अपराध, मंदार पाटील, संदीप देसाई आदींचा समावेश होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा