अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कला शिक्षकांची भरती करून त्यांना शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार वेतन श्रेणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम पाटील, कोषाध्यक्ष मधुकर पवार, जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे, कला शिक्षक सतीश लिंडाईत, संदीप पवार आदी उपस्थित होते. शिक्षण संचालकांकडील सहा नोव्हेंबर १९८५ च्या परिपत्रकानुसार पाचवी ते दहावीपर्यंत एकेक तुकडी जरी असली तरी कला शिक्षकांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी पाचवी ते सातवी इयत्तांसाठी डी. एड्. किंवा बी.एड्. शिक्षकांची नेमणूक केली जाते व त्यास शिक्षणाधिकारी मान्यता देतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक स्तरावर कला शिक्षक पहिली ते आठवीपर्यंत अनिवार्य असून नववी व दहावी कार्यानुभव अंतर्गत कला विषय ऐच्छिक आहे. शाळेत कला शिक्षकांची नियुक्ती करताना कला व कार्यानुभव या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे.
ज्या शाळेत आवश्यकता असूनही कला शिक्षकाचे पद रिक्त आहे. अशा रिक्त पदावर कला शिक्षकांचा विशेष अनुशेष भरून काढावा, कला शिक्षकाचा पूर्ण कार्यभार असूनही सामान्य शिक्षकांची नियुक्ती केल्यास त्यास मान्यता देऊ नये, कला शिक्षक नेमताना त्याच्याकडे कला अध्यापनाची पदविका असावी. तसेच पाचवी ते सातवीच्या वर्गाकरिता २५:७५ या प्रमाणात मान्य असलेल्या शिक्षकांच्या व्यतिरिक्त कला शिक्षकाला त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी मिळण्यास पात्र समजावे तसेच आपल्या शाळेतील कला शिक्षक पदव्युत्तर पदवीधर किंवा संबंधित पदवीधर असेल तर त्याचा प्रस्ताव शिक्षणशास्त्र पदवी समकक्ष वेतनश्रेणी मंजुरीसाठी तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी एक जून २०१२ रोजी शिक्षण उपसंचालकांकडे पत्राव्दारे कार्यवाही होण्यासंदर्भात पाठपुरावा करूनही काहीच झालेले नसल्याचे निवेदनाव्दारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा