नगरपालिकेच्या कोटय़वधी रूपयांच्या घरकूल घोटाळा प्रकरणी संशयित जळगावचे पालकमंत्री गुलाब देवकर यांच्यासह साऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी दोषारोप निश्चित करण्याचे काम नुकतेच झाले. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री देवकर यांचाही समावेश आहे. या घोटाळ्यातून आपली नावे वगळण्यात यावी, यासाठी संशयित असलेल्या काही आजी-माजी नगरसेवकांनी केलेला अर्ज न्या. एन. आर. क्षीरसागर यांनी फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून घोटाळ्यातील सर्वच संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
पालकमंत्री देवकरही घोटाळ्यातील एक संशयित आरोपी असून या प्रकरणी त्यांना गेल्यावर्षी अटक झाली होती. पण, त्यांना लगेच जामीनही मिळाला होता. त्यानंतर देवकरांच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन रद्द केला होता. त्यानंतर देवकर यांनी साऱ्यांनाच चकमा देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती आणली असून त्या प्रकरणाची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.
देवकर यांना घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी २१ मे २०१२ रोजी अटक केल्यानंतर त्यांनी नैतिकतेला धरून राजीनामा देणे आवश्यक होते अथवा पक्षाने तरी त्यांना पदमुक्त करणे आवश्यक होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यावरही ते मंत्रीपदाला चिटकुन राहिले. सर्वोच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देवकरांवरही दोषारोप पत्राची निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आतातरी राजीनामा देऊन न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे, अशी मागणी होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा