राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून दलित व मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यात तीन बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून झाल्याची संतापजनक अशी घटना घडली आहे. एकाच वेळी तीन बहिणींचे अपहरण, अत्याचार व खून हा जाणीवपूर्वक केलेला अत्याचार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. दलितांवर मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना सरकार व पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आर. आर. पाटील यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गमावलेले गृहखाते पुन्हा काबीज करण्यात यश मिळविले असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे अपयशी ठरलेले आर. आर. पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Story img Loader