उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. त्याचबरोबर धरणांतून, कालव्यांतून पाणी सोडण्याच्या पुढाऱ्यांच्या मागण्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी याबाबत थेट विधानसभेतच मुळा धरणातील पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्याची मागणी केली. विधानसभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कर्डिले यांनी मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे, त्याचा पिण्याच्या पाण्यासाठीही उपयोग होईल अशी मागणी केली. मुळा धरणात सध्या ८.५ टीएमसी पाणी आहे. त्यातील ४ टीएमसी पाणी डेड स्टॉक आहे. पिण्याचे पाणी त्यातून राखीव ठेवून उर्वरित पाणी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडावे, त्यातून शेतीचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, शिवाय कालवा व नदीलगत असलेल्या बंधारे तलाव भरून घेता येतील, पाणी योजनांचे उद्भव त्यामुळे सुरू होतील व त्यात्या योजनाही सुरू होतील असे कर्डिले यांनी सुचवले.
माजी आमदार राजीव राजळे यांनी आदी फौंडेशनच्या माध्यमातून मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंग जगताप यांची भेट घेतली व त्यांच्याकडे मुळा उजव्या कालव्यातून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी केली. त्यांच्यासमवेत सुभाष ताठे, विष्णूपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, बापुसाहेब पाटेकर, श्रीकांत मिसाळ, अनिल ढमाळ, सोपानराव तुपे, भीमराज सागडे आदी होते. मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, जोहरापूर, हिंगणगाव, खामगाव, आखतवाडे, आपेगाव, ढोरजळगाव आदी अनेक गावे येतात. या सर्वच गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू आहेत. सर्व पाणी साठे कोरडे झाले आहेत. आवर्तन सोडल्यास त्यांची पाण्याची पातळी वाढेल व किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटले असे राजळे व शिष्टमंडळाने जगताप यांना सांगितले. त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा