शेतीसाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. भोसा खिंडीतून सीना धरणासाठी त्यातूनच वाढीव पाणी सोडावे या मागणीसाठी तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण घुले यांनी ही माहिती दिली.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सीना धरणात अतिशय कमी पाणीसाठा आहे. या धरणाच्या परिसरात यंदाही कमी पाऊस पडला. कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले त्या वेळीच हे धरण पूर्ण भरून देण्याची गरज होती, मात्र तसे झाले नाही. सीना धरणाचा केवळ कर्जत तालुका नाही तर श्रीगोंदे, आष्टी व नगर तालुक्यातील काही गावांना लाभ होतो. त्यामुळे चालू आवर्तनात सीना धरण भरून देणे गरजेचे आहे.
रब्बीच्या पिकांसाठी सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे. शेतकऱ्यांनी पाणीअर्ज भरून द्यावेत. चालू आवर्तनात सीना नदीच्या काठावरील काही गावे वंचित राहात आहेत. त्यामुळे त्या गावातील पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुकडीचे आवर्तन नुकतेच सुटले आहे. कर्जत बरोबर श्रीगोंदे, करमाळा, पारनेर, जुन्नर या तालुक्यांना हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील शेतीचे एक थेंबही पाणी कमी न करता सीना धरणात वाढीव पाण्याची तरतूद करून पाणी सोडण्यात यावे अशी परिसरतील शेतकऱ्यांची मागणी आहे. हे पाणी धरणात सोडल्यास परिसरातील पाण्याचे स्रोतही बळकट होतील व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही, पिकांनाही जीवदान मिळेल. यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना शिष्टमंडळ भेटणार आहे.

Story img Loader