कोपरगाव नगर परिषद हद्दीतील लोकसंख्या जवळ जवळ ६५ ते ७० हजारावर गेली असून नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधेबाबत प्रचंड तक्रारी येत असून भविष्यातील पाणी प्रश्न, आरोग्य, स्वच्छता व अतिक्रमण काढल्यामुळे विस्थापित झालेल्या लहानमोठय़ा व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्थेसाठी किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करावी. तसेच कोपरगाव नगरपालिका प्रश्नांकरिता मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन विकासाला चालना द्यावी अशी मागणी आमदार अशोकराव काळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी शिर्डी येथील दौऱ्यात समक्ष भेटून चर्चा केली.
कोपरगाव नगरपालिकेचा पाणी प्रश्न सोडविताना साठवण क्षमतेत वाढ होणे आवश्यक असून त्याकरिता मौजे येसगाव शिवारातील २० एकर क्षेत्रात साठवण तलाव निर्माण करून मोटार पंपिंग स्टेशनकरिता किमान १५ कोटी, तर नगरपालिकेने केंद्र शासनाकडे प्रस्तावित केलेल्या ३२ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरीसाठी प्रयत्न तसेच फिल्ट्रेशन प्लँटच्या दुरुस्तीकरिता किमान २ कोटी, सन १९३५ मध्ये झालेल्या या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालल्याने पिण्याचे पाणी सोडताना पाण्याची टाकी स्वच्छ करताना वाया जाणारे २.५० ते ३ लाख लिटर पाणी रिसायकलिंग करून पुन्हा पिण्यासाठी वापरता यावे याकरिता १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून नगरपालिकेच्या हद्दीतील ६ विहिरींचे गाळ काढणे, खोलीकरण व पाईप लाईनसाठी किमान १ कोटी रुपये उपलब्ध व्हावे अशी मागणी केली आहे.
तसेच अतिक्रमण काढल्यानंतर जवळ १७०० ते १८०० लहान-मोठय़ा व्यावसायीकांचा निर्माण झालेला प्रश्न सोडविताना नगरपालिकेने मागितलेल्या जागांना तातडीने मंजुरी मिळावी, सार्वजनिक शौचालयाकरिता नावीन्यपूर्ण योजना, नगरोत्थान कार्यक्रम व यूडी-६ योजनेंतर्गत किमान १० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत तसेच भुयारी गटार योजनेकरिता नदी संवर्धन प्रकल्प व भुयारी गटार योजनेंतर्गत किमान ५० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांकरिता किमान ३० कोटी रुपये निधी अत्यावश्यक असून १३ वा वित्त आयोग व घन कचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत किमान १० कोटी रुपये शहरातील स्वच्छतेसाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा विविध मागण्या कोपरगाव शहर विकासाच्या दृष्टीने आमदार काळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे केल्या.

Story img Loader