मनमाड ते मुंबई दरम्यान सध्या धावत असलेल्या राज्यराणी एक्स्प्रेसला आवश्यक तसे उत्पन्न मिळत नाही तसेच ही एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात ११ तास थांबून राहत असल्याने ती गाडी भुसावळपर्यंत वाढविल्यास खान्देशातील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल, याकडे लक्ष वेधून ही गाडी भुसावळपर्यंत विस्तारीत करावी, अशी मागणी खा. ए. टी. पाटील यांनी केली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रेल्वे अंदाजपत्रकात खान्देशातील मागण्या पूर्णत्वास जाव्यात, याकरिता खा. पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. पंचवटी एक्स्प्रेसवरील वाढता ताण लक्षात घेऊन नाशिक-मुंबई मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची प्रदीर्घ काळाची मागणी गतवर्षी पूर्णत्वास गेली. ही मागणी पूर्णत्वास जात नाही तोच, आता तिचा पल्ला विस्तारण्याची मागणीही जळगावकरांकडून पुढे केली जात असल्याने नाशिकच्या प्रवासी वर्गात अस्वस्थता पसरणार आहे. रेल्वे अंदाजपत्रकाच्या पाश्र्वभूमीवर, खा. पाटील यांनी पत्रकार परिषदेत खान्देशातील विविध रेल्वे प्रश्नांबरोबर राज्यराणी एक्स्प्रेसचा पल्ला भुसावळपर्यंत विस्तारण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आल्याचे नमूद केले. भुसावळ – पुणे एक्सप्रेसला दोन शयनयान श्रेणी व एक वातानुकूलीत शयनयान श्रेणीचा डबा लवकरच (बजेटपूर्वी) जोडण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी मान्य केली आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे आणि रेल्वेचे महाप्रबंधक आणि पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकाची विविध मागण्यांविषयी चर्चा केली होती. महाप्रबंधक जैन यांनी भुसावळ विभागास भेट दिल्यानंतर भुसावळ -पुणे एक्सप्रेसला डबे जोडण्याची मागणी तत्वत: मंजूर केली. तसेच जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, म्हसावद येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या कामास ‘जीएडी’ची तांत्रिक मंजुरी मिळाली असून त्या कामाची १५ दिवसात निविदा निघणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.
महाप्रबंधकांशी झालेल्या चर्चेदरम्यान लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडावेत, पुणे-पटणा एक्स्प्रेसला जळगाव व चाळीसगाव येथे थांबा मिळावा, मुंबई महानगरी वाराणसी एक्स्प्रेसला जळगाव व चाळीसगाव येथे थांबा मिळावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आगामी रेल्वे अंदाजपत्रकात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास खा. पाटील यांनी रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.
ई-तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली तरी तिकीटांचा काळाबाजार थांबलेला नाही. त्यासाठी रेल्वेने एक विभागीय स्तरावर समिती नेमावी त्यात लोकप्रतिनिधींद्वारे नामनिर्देशीत चार तज्ज्ञ मंडळीचा समावेश करावा अशी मागणी खा. पाटील यांनी केली आहे.
जळगाव ते उधणा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम २०१५ पर्यंत पुर्ण होईल, असे सांगून त्यांनी जळगाव शहरातील पिंप्राळा गेट, दुध विकास संघ आणि शिवाजीनगर या तीन उड्डाण पुलांसाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनानेप्रत्येकी ५० टक्के खर्च उचलावा, असा आग्रह धरला आहे. यावेळी भुसावळचे आ. संजय सावकारे, नगरसेवक अजय भोळे, भाजप शहराध्यक्ष रमण भोळे, रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष ललित मुथा आदी उपस्थित होते.
‘राज्यराणी एक्स्प्रेस’ ला भुसावळपर्यंत विस्तारण्याची मागणी
मनमाड ते मुंबई दरम्यान सध्या धावत असलेल्या राज्यराणी एक्स्प्रेसला आवश्यक तसे उत्पन्न मिळत नाही तसेच ही एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात ११ तास थांबून राहत असल्याने ती गाडी भुसावळपर्यंत वाढविल्यास खान्देशातील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल.
First published on: 01-02-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to extend rajyarani express upto bhusawal