नव्याने लागू करण्यात आलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे प्रमाण त्वरित लागू करावे, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ ठोंबरे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, दरवर्षी शाळेचा पट निश्चित करताना सन १९५० च्या कायद्याप्रमाणे ५० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक निश्चित केला जातो. गेल्या ६२ वर्षांपासून हेच सुरू आहे. मात्र, सन २००९ मध्ये केंद्र सरकारने शिक्षणाचा हक्क कायदा केला असून त्यानुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे प्रमाण आहे. कायदा लागू होऊनही राज्यात नेमके शिक्षकांचे प्रमाण सोडून अन्य तरतुदींची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे काही शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतात. त्यांच्या नोकरीवर गदा येते. यातून त्यांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. मुलांचे नुकसान होते. त्यामुळे ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या नियमाची अंमलबजावणी राज्यात त्वरित सुरू करावी, तसेच १५० विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक याचीही अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी ठोंबरे, तसेच विठ्ठल उरमोडे, चंद्रशेखर देशपांडे, गणेश येमुल, प्रफुल्ल मुळे, संजय चौरे, सुमन गोसावी, संध्या मकाशीर यांनी केली आहे.