दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे हिंगणा, भिवापूर व उमरेड तालुका वगळता शंभर टक्के नुकसान झाले आहे. तुटपूंजी मदत करून नुकसानग्रस्तांची थट्टा न करता प्रशासनाने सव्रेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना एकरी १० हजार व हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
कुही तालुक्यात शंभर टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कामठी, कळमेश्वर, नरखेड व नागपूर तालुक्याचा दौरा केला असता खरीब, रब्बी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. निसर्गाने जणू शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळविला आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ातील एकूण ४३ हजार २४३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गहू, हरभरा, भाजीपाला आणि इतर पिकांचा समावेश आहे. नुकसानीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सव्रेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे सुरू करून बाधित कुटुंबांना व नागरिकांना तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, बाधित प्रत्येक घरांना पाच हजार रुपये व रेशन मोफत देण्याची मागणी गोतमारे यांनी केली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, माजी जि.प. अध्यक्ष रमेश मानकर, आनंदराव राऊत उपस्थित होते.

Story img Loader